लोक वार्ता – राज राठोड
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, मिलिंद मोहिते, यांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण ७०६ आरोपींवर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
परिमंडळ–२ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या गुन्हे अभिलेखांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, धमकी, शिवीगाळ, बेकायदेशीर अग्नीशस्त्र व लोखंडी शस्त्रांचा वापर, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, खंडणी, बेकायदेशीर दारू विक्री तसेच सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या आरोपींचा समावेश आहे.
पोलीस स्टेशन कारवाई :
स्वारगेट – १०८
सहकारनगर – १०७
पर्वती – १००
बिबवेवाडी – १००
मार्केटयार्ड – ५९
भारती विद्यापीठ – १२५
आंबेगाव – १०७
एकूण : ७०६ आरोपी
दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सदर आदेश लागू करण्यात आला असून, आरोपींचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यात आला आहे. मात्र, या आरोपींना भारती विद्यापीठ, स्वारगेट, आंबेगाव, पर्वती, मार्केटयार्ड, बिबवेवाडी व सहकारनगर या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करणे, वास्तव्य करणे, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मिरवणूक किंवा कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक वावरात सहभागी होण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तसेच सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास स्पष्ट प्रतिबंध घालण्यात आला आहे. या आदेशाचा भंग केल्यास संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
सदर कारवाई मा.श्री. अमितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त प.प्रा.वि. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आलेली आहे. यापुढील काळात देखील पोलीस उप आयुक्त परिमंडळ -२ पुणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंधक करणेकामी भर देण्यात येणार आहे.




















