लोक वार्ता – राज राठोड
पुणे : नामांकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
कागदपत्रांच्या कारणावरून दबावाचे राजकारण:
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२५ मध्ये एका विद्यार्थीनीने तिची मूळ कागदपत्रे परत मिळवण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे.
POCSO कारवाईची धमकी देत खंडणीची मागणी:
विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याचा दावा करत प्राचार्यांवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आली. तसेच संस्थेची बदनामी होईल, अशी भीती निर्माण करून सुरुवातीला १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
तडजोडीनंतर ७ लाख रुपये ठरविण्यात आला. २८ जुलै २०२५ रोजी ही रक्कम कॉलेजमधील एका कर्मचाऱ्यामार्फत आरोपींकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर उघड झाला बनाव:
घडलेल्या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांसह पोलीस आयुक्तालयात तक्रार केली. या तक्रारीच्या चौकशीत संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा प्रकार रचल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत खंडणी उकळल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे आणि महिला पोलीस अंमलदार सोनाली हिंगे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२), ३०८ (६), ६१ (२) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतीलच कर्मचाऱ्यांकडून असा प्रकार घडल्याने पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी होत आहे.




















