लोक वार्ता – राज राठोड
पुणे | उच्चभ्रू सोसायटींमध्ये पहाटेच्या वेळी होणाऱ्या घरफोड्यांच्या घटनांना आळा घालण्यात विमानतळ पोलिसांना यश आले असून, दुध टाकणाऱ्या व्यक्तीचा वेश धारण करून घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून चोरी केलेली १लाख ३२हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी अॅमिनन्स बाय नाईकनवरे, न्यू एअरपोर्ट रोड, विमाननगर, पुणे येथील उच्चभ्रू सोसायटीत राहणारे सूर्यनारायण राजरतिलम यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने १लाख ३२हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व त्यांच्या तपास पथकाने सुरू केला. तपासादरम्यान सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दुध देण्यासाठी आलेला इसम संशयास्पदरीत्या घराच्या परिसरात वावरताना दिसून आला. दुधवाला असल्याचा बनाव करून तो घराच्या बाहेर रेकी करत असल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवून व्यंकटेश वसंत करंडे (वय ३४ वर्षे, रा.विद्यानगर, वडगावशेरी, पुणे) यास ताब्यात घेतले. अधिक चौकशीत आरोपीने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली १लाख ३२हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दुधवाला, कचरा गोळा करणारा अथवा इतर सेवकांच्या वेशात येऊन चोरी करणाऱ्यांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन विमानतळ पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु क-हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, अभयकुमार नागटिळक, शंकर वाघुले व सना शेख यांनी केली.




















