लोक वार्ता – राज राठोड
पुणे: कोंढवा भागात पार्किंगच्या वादातून सुरू झालेला राडा थेट ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून, ७ ते ८ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी फिर्यादीवर ससूनच्या गेटसमोरच हल्ला चढवला. या घटनेने पुणे पोलिसांवरच प्रश्न निर्माण झाले आहे, “पुणेकर सुरक्षित आहेत का?” असा सवाल विचारला जात आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोंढव्यातील कौसरबाग येथील करिम कॅफे शेजारील एका मोकळ्या जागेत फिर्यादी (वय २९ वर्षे) आपल्या मित्रांसह बसले होते. यावेळी कौसरबाग कब्रस्थान येथील पार्किंगवरून फिर्यादी आणि टोळक्यांमध्ये वाद झाले आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी हत्याराने बेदम मारहाण केली.
मारहाणीनंतर फिर्यादीने धाडस दाखवून कोंढवा पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. कोंढवा पोलिसांनी जखमी फिर्यादीला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले.
मात्र, गुन्हेगारांना पोलिसांचा किती धाक उरला आहे, याचे विदारक चित्र ससूनच्या गेटवर पाहायला मिळाले. फिर्यादी उपचारासाठी जात असतानाच, दबा धरून बसलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने हातात धारदार कोयते घेऊन फिर्यादीवर ससूनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच जीवघेणा हल्ला केला,कोंढवा पोलिसांनी या संदर्भात काही जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

एकीकडे पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी, वाहनांची तोडफोड, टोळक्यांकडून कोयते घेऊन दहशत माजवणे, गुंडांकडून अग्निशस्त्र बाळगणे, आणि विनयभंगाच्या घटनांनी नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यातच आता पोलिसात तक्रार दिल्यावरही जर फिर्यादी सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? ससूनसारख्या गजबजलेल्या शासकीय रुग्णालयाच्या दारात टोळके शस्त्रांसह धुमाकूळ घालतात, हे पोलिसांचे मोठे अपयश मानले जात आहे. कोंढवा पोलिसांची या गुंडांमध्ये भीती राहिली नाही का, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे,
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार :
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा, एमडी, आणि मटक्याचे धंदे इतक्या जोमात सुरू आहेत की, कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न पडतो. कोंढवा परिसरामध्ये अवैध धंदे चालू असल्याचे, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ देखील वायरल झाले आहेत,
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या पोलिसांनी हे धंदे उखडून टाकायचे, तेच या काळ्या कृत्यांकडे डोळेझाक करत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, यातील काही अवैध धंद्यांमध्ये चक्क पोलीस कर्मचाऱ्यांचेच साटेलोटे असल्याची धक्कादायक चर्चा आहे. जर रखवालदारच भक्षकांचे पाठीराखे होणार असतील, तर सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी कुणाकडे पाहायचे?
असे अनेक प्रश्न पुणेकर विचारत आहे.
विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे शहर आता गुन्हेगारांचे शहर बनत चालले आहे की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
टोळक्यांचा हा धुमाकूळ पुणे पोलीस आयुक्त कसे मोडून काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















