लोक वार्ता | राज राठोड
पुणे : कर्जाची परतफेड करण्यासाठी चुलत भावाच्या घरातच घरफोडी करणाऱ्या इसमास मुंढवा पोलिसांनी अटक करून तब्बल २२ लाख ११ हजार रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणामुळे नातेसंबंधांतील विश्वासघाताची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दिनांक ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेपासून ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सर्वे नंबर ९४/बी, मुंढवा, पुणे येथील फिर्यादी यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ३७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक किलो चांदी तसेच रोख २ लाख रुपये, असा एकूण २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी, घटनास्थळी पाहणी केली. तपासादरम्यान घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे कोणतेही ठोस चिन्ह नसल्याने, हा प्रकार ओळखीच्या व्यक्तीनेच केल्याचा संशय पोलिसांना आला.

त्या अनुषंगाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तपासात फिर्यादी यांचा नातेवाईक आशुतोष अशोक कासवा (वय ३८), रा. सर्वे नं. ९४/बी, मुंढवा, पुणे याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने कर्जाच्या परतफेडीसाठीच चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले संपूर्ण सोन्याचे दागिने, एक किलो चांदी आणि रोख रक्कम, असा एकूण २२ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
चोरीस गेलेला सर्व ऐवज परत मिळाल्याने फिर्यादी यांनी मुंढवा पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ६, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. अतुल कुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस स्टेशनकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती स्मिता वासनिक यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहा. पोलीस फौजदार, राजु कदम, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर व योगेश राऊत यांनी केली.




















