लोक वार्ता – राज राठोड
पुणे | दि. १२ फेब्रुवारी २०२६ :
हडपसर परिसरात स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक मानवी वाहतुकीच्या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला असून अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या पथकाने “व्हाईट पर्ल स्पा” येथे छापा टाकत वेश्याव्यवसायावर कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका पुरुष आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून हडपसर गाडीतळ, पुणे–सोलापूर रोडवरील दशमेश कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या,व्हाईट पर्ल स्पा,मध्ये महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने अनैतिक व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. माहिती खरी ठरल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला.

स्पा मॅनेजरची अटक, मालक संशयाच्या भोवऱ्यात
छाप्यादरम्यान स्पा मॅनेजर
सौरभ शामराव इंगळे (वय २८, रा. लक्ष्मीमाता मंदिर, काळेपडळ, हडपसर, पुणे)
यास ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात स्पा मालकाचाही या अनैतिक कृत्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
३ महिलांची सुटका:
स्पामध्ये वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या तीन महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. त्यांना आवश्यक ते संरक्षण, वैद्यकीय मदत व समुपदेशन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल:
या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १४३ (१)(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा, १९५६ अंतर्गत कलम ३, ४ व ५ प्रमाणे कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच इतर ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय सुरू आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईचा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३, श्री. शंकर खटके, पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, रेश्मा कंक व भुजबळ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.




















