लोक वार्ता – राज राठोड
पुणे: शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना, नात्यांच्या मर्यादा ओलांडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून आत्याच्या मुलानेच आपल्या नातेवाईकाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.
बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील अश्विनी पॅराडाईज सोसायटीजवळ सोमवारी पहाटे सुमारे पावणे पाचच्या सुमारास ही थरारक घटना घडली. रोहन कांतीलाल ओव्हाळ (वय २८, रा. काकडे वस्ती, कोंढवा) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी कौशल लांडगे (वय २०, रा. हडपसर काळेपडळ ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या एका साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कौशल लांडगे हा मृत रोहनचा आत्येभाऊ आहे. दोघांमध्ये काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होते. हाच वाद सोमवारी पहाटे हिंसक वळणावर गेला.
रागाच्या भरात कौशल आणि त्याचा साथीदार यांनी रोहनवर हल्ला चढवला. सिमेंटचा गट्टू तसेच लाकडी बॅटम पट्टीने डोक्यावर वारंवार प्रहार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या रोहनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी वेगाने हालचाल करत खुनाचा गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी कौशल लांडगे याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




















