लोक वार्ता – राज राठोड
पुणे : शहरात वाढत्या फसवणूक व लूटप्रकरणांच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वृद्ध इसमास रिक्षामधून सोडण्याच्या बहाण्याने त्याच्या सामानातील रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-४ पथकाने अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या रकमेपैकी २४ हजार ५०० रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

वाकडेवाडी बसस्टँड परिसरातील घटना:
दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी वाकडेवाडी बसस्टँड परिसरात एका वृद्ध इसमास रिक्षामध्ये बसवून त्याला सोडण्याचा बहाणा करण्यात आला. त्याचवेळी तीन ते चार इसमांनी संगनमताने त्याच्या सामानातील रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी खडकी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेचा सापळा आणि अटक:
वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा पुणे शहर युनिट-४ पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी खडकी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अंमलदार सुभाष आव्हाड व किशोर दुशिंग यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, गुन्ह्यातील संशयित रिक्षा (क्र. एमएच/१२/एचसी/४१०७) वाकडेवाडी बसस्टँड येथे येणार आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने वाकडेवाडी बसस्टँड येथे सापळा रचला. काही वेळातच बातमीतील वर्णनाची रिक्षा दिसताच पोलिसांनी ती थांबवून चालकाची चौकशी केली.
आरोपीची ओळख आणि कबुली:
चौकशीत आरोपीने आपले नाव इदरीश शफिक शेख (वय ३६ वर्षे), रा. शिवसेना ऑफिसजवळ, बावधान, पुणे (मूळ पत्ता- तुख्मापुर, हरवंश, नगीना, जिल्हा बिजनौर, उत्तरप्रदेश) असे सांगितले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या मित्रासह इतर दोन साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.

दोन पंचांसमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता चोरीस गेलेल्या रकमेपैकी २४,५०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा (क्र. एमएच/१२/एचसी/४१०७) जप्त करण्यात आली. एकूण १,४९,५०० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला आहे.
इतर साथीदारांचा शोध सुरू:
या प्रकरणातील उर्वरित साथीदारांचा शोध सुरू असून, नागरिकांनी अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवताना दक्षता बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री. राजेंद्र मुळीक, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-४, गुन्हे शाखा कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार, हरीष मोरे, एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार, सुभाष आव्हाड, किशोर दुशिंग, प्रविण भालचिम, विठ्ठल वाव्हळ, अमजद शेख, शरद झांजरे, रोहिणी पांढरकर, मयुरी नलावडे, यांनी केली.




















