लोक वार्ता – राज राठोड
पुणे, दि. १७ मार्च २०२६. शहरात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष पेट्रोलिंगदरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट-६ ने मोठी कारवाई करत खुनाच्या प्रयत्नाचा कट उधळून लावला. या कारवाईत ४ विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून ३ धारधार कोयते आणि एक गिलवर जप्त करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुडीपाडवा आणि रमजान सणाच्या अनुषंगाने युनिट-६ चे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एका अॅक्टिव्हा दुचाकीवरून चार जण संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोघेजण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्यांना पकडले.
ताब्यात घेतलेल्या मुलांची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून ३ कोयते आणि एक गिलवर आढळून आले. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली अॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण ८१,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. ताब्यातील एका बालकाच्या भावाला सुमारे १५ दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी या चौघांनी एकत्र येत खुनाचा कट रचला होता आणि त्यासाठीच ते हत्यारांसह निघाले असल्याची कबुली त्यांनी दिली.
या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित बालकांना पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी अशा कारवाया महत्त्वाच्या ठरत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदिपान पवार, गुन्हे शाखा युनिट-६, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, म.पो. अंमलदार पल्लवी मोरे, पोलीस अंमलदार गणेश माने, शेखर काटे, अनिल जामगे यांचे पथकाने केली.




















