लोक वार्ता – राज राठोड
पुणे: फिरायला गेलेल्या नागरिकांना गाठून त्यांना मारहाण करत मोबाईल लुटणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. रिव्हर व्ह्यू सिटी परिसरात झालेल्या जबरी चोरीचा छडा लावत पोलिसांनी अवघ्या ८ तासांत ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या मागील रेल्वे लाईनजवळील मोकळ्या जागेत वॉकिंग करत होते. यावेळी चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास पथकाची वेगवान कामगिरी
गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वेगाने चक्र फिरवली. गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून चारही संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) सुजल बाळासाहेब झेंडे (वय २०, रा. भेकराईनगर, हडपसर)
२) शुभम संजय चव्हाण (वय २४, रा. गोसावी वस्ती, हडपसर)
३) ओमकार अशोक चितंलु (वय २१, रा. आनंदनगर सोसायटी, हडपसर)
४) अभिजीत सतिष कांबळे (वय २०, रा. कदमवाकवस्ती, हवेली).
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या आणि चोरलेल्या वस्तूं असा एकूण १,५७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये:
महागडा मोबाईल फोन
२ मोटारसायकली
पोलिसांचे आवाहन:
परिसरात सकाळी किंवा संध्याकाळी निर्जन स्थळी फिरताना नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”
लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या ८ तासांत केलेल्या या कामगिरीमुळे परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०६, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्मिता पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, बाजीराव वीर, प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले व अशोक गिरी यांनी केली.




















