लोक वार्ता –राज राठोड
पुणे : शहरातील स्वारगेट परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने भीषण रूप धारण करत थरारक हल्ल्याची घटना समोर आली आहे. महर्षीनगर भागात इडलीचा हातगाडा लावण्याच्या वादातून अमृततुल्य दुकानाच्या मालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात अमृततुल्य मालकाचा हात तुटल्याची धक्कादायक घटना घडली असून त्याचा सहकारीही गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ‘व्यंकटेश अमृततुल्य’च्या मालकाचा आणि शेजारी इडलीचा हातगाडा लावणाऱ्या व्यक्तीमध्ये किरकोळ वाद झाला होता. हा वाद मनात धरून संबंधित हातगाडीवाल्याने आज दि. २८ मार्च २०२६ दुपारी १ ते १:३० वाजताच्या सुमारास, तीन ते चार साथीदारांना सोबत घेऊन अमृतुल्य मालकावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत मालकावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात स्वतःचा बचाव करताना मालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेदरम्यान त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे.
जखमी दोघांनाही तातडीने ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे महर्षीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, किरकोळ वादातून अशा प्रकारे हिंसाचार होणे ही गंभीर बाब असून शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.




















