लोक वार्ता – राज राठोड
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून शहरातील विविध भागात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.२० ते ७.३० या वेळेत काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत तरवडेवस्ती, वाडकरमळा, सय्यदनगर, चितामणी नगर, सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग, श्रीराम चौक, रुणवाल सोसायटी, गंगा व्हिलेज, साठेनगर, अल्कासा सोसायटी, ससाणेनगर, हांडेवाडी रोड व महंमदवाडी परिसरात पायी रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक व उपनिरीक्षक, एसआरपीएसचे जवान, पुरुष व महिला पोलीस अंमलदार, क्रॉप्स मार्शल, सीआर मोबाईलवरील अंमलदार तसेच होमगार्ड मिळून मोठ्या संख्येने पोलीस दल सहभागी झाले होते.

याच दिवशी सकाळी ११ ते १२ या वेळेत हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतही रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. हा रूट मार्च पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पार पडला. हडपसर गाडीतळ, मंत्री मार्केट, भाजी मंडई, मुंढवा क्षेत्रीय कार्यालय, पांढरे मळा, हडपसर गावठाण व गांधी चौक या मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, अंमलदार, एसआरपीएफ व होमगार्ड तैनात होते.
निवडणूक दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असल्याने, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या रूट मार्चचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.




















