पुणे क्राईम न्यूज
पुणे : मार्केटयार्ड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथक-१, गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत गोळीबार करून एकास गंभीर जखमी करून फरार झालेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून विदेशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार : स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील मिनाताई ठाकरे वसाहतीत वास्तव्यास असलेल्या ८ ते ९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीने जुन्या वादातून हा थरार घडवून आणला. दिनांक ६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.२० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास मोझेस मल्लिकार्जुन शेकापुरे (रा. काकडे वस्ती, कोंढवा) हे आपल्या भावासह व मित्रासोबत महर्षीनगर येथे शिवजयंती उत्सव पाहून दुचाकीवरून घरी परतत होते.
यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग करत वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक रोडवरील बन्सीलाल नेमीचंद ओस्तवाल यांच्या दुकानासमोर त्यांना अडवले आणि पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोझेस शेकापुरे जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्र. ३१/२०२६ दाखल करण्यात आला असून त्यात भारतीय न्याय संहिता, आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार विविध कलमे लावण्यात आली आहेत.
घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तात्काळ तपास पथके तयार केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला.

या तपासात राजू उमाप (वय ५५), शुभम दिलीप पवार (वय २०) व आनंद उमाप (वय २२) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपासात इतर आरोपींचा शोध सुरू असतानाच खंडणी विरोधी पथक-१ चे पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना गोपनीय माहिती मिळाली की मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, येथील गोळीबारातील उर्वरित आरोपी नांदेड सिटी गेट परिसरात जोगेश्वरी विसरच्या मागील बाजूस लपून बसले आहेत.
तसेच त्याचेजवळ पिस्तुल असुन पोलीस पथकावर गोळीबार करणार असल्याची माहिती मिळाली सदर बातमीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांचे नेतृत्त्वाखाली सदर परीसरात चारही बाजुनी घेराव घालुन छापा टाकणेत आला त्यानंतर दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे १) बालाजी उमाप, वय २२ रा मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी पुणे, २) साहिल चव्हाण, वय २० वर्षे रा. सदर यांना दाखल गुन्हयांचे अनुषंगाने ताब्यात घेवुन त्यांचेकडुन विदेशी बनावटीचे पिस्तुल जिंवत काडतुसे तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस स्टेशन करत आहे
सदरची कारवाई, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग. पुणे शहर, (अति. कार्यभार) श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०२, पुणे शहर श्री मिलिंद मोहिते, मा. सहा पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग, श्री राहूल आवारे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित जगताप, पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुनिता नवले, यांचे आदेशाने तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुधीर कटारे, सिध्दनाथ खांडेकर, सहा. पोलीस निरीक्षक, अश्विनी कट्टे, पोलीस उप-निरीक्षक सौरभ माने, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भापकर, पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जाधव, राऊत, किरण जाधव, जेधे, प्रविण तायडे, अमरनाथ लोणकर, संदिप सुर्यवशी तसेच खंडणी विरोधी पथक-१ कडील सहा. पोलीस निरी. राजेश माळेगावे व पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे मयुर भोकरे, अमर पवार, राजेंद् लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख यांनी संयुक्तपणे केली.




















