लोक वार्ता –राज राठोड
पुणे : काळेपडळ: शहरात गुन्हेगारीचे नेटवर्क पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगार रिजवान ऊर्फ टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जमिनीच्या वादातून खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यात तपास करत असताना, या टोळीचे संघटित गुन्हेगारी कृत्य समोर आले. यामुळे, टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA-मोक्का) १९९९ अंतर्गत पुन्हा कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
काळेपडळ पोलीस ठाण्यात गु. र. क्र. ४०४/२०२५ नुसार दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासात, मुख्य आरोपी रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत आणि मारामारी अशा स्वरूपाचे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी सन २०२० पासून मौजे हडपसर, सय्यदनगर येथील एका फिर्यादीच्या मालकीच्या १२९० चौरस फूट भूखंडावर सातत्याने अतिक्रमण केले. आरोपींनी या प्लॉटवरील पत्र्याचे शेड तोडून नुकसान केले आणि त्याठिकाणी स्वतःचे नवीन शेड उभारले.
२५ लाखांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी:
या भूखंडाचा ताबा घेतल्यानंतर, टिपू पठाण आणि त्याचे साथीदार हा भूखंड तिसऱ्या व्यक्तींना भाड्याने देऊन त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा फिर्यादीने त्यांच्या जागेचा ताबा परत घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी हा भूखंड खाली न करण्याच्या बदल्यात फिर्यादीकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नव्हे, तर ‘या जागेत पुन्हा आले तर जिवंत जाणार नाही,’ अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली.
सदर गुन्हेगारी कृत्ये ही केवळ वैयक्तिक वाद नसून, आरोपी रिजवान ऊर्फ टिपू पठाण याने आपले गुन्हेगारी वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने, आपल्या संघटित टोळीमार्फत केली असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या निष्कर्षांनंतर, काळेपडळ पोलिसांनी तातडीने कठोर पाऊल उचलत, दाखल गुन्ह्यात टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ‘मोक्का’ (कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४)) कायद्याची कलमे समाविष्ट केली आहेत.
पुणे शहरातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना या कारवाईमुळे बळ मिळाले आहे.
सदरची कामगिरी ही श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली. सहाय्यक पोलीस आयुक्त, नम्रता देसाई, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव, पो. हवा. राजेंद्र वाघमारे, बिपीन सुर्यवंशी, हनुमंत कांबळे, प्रतिक लाहिगुडे, प्रविण काळभोर, पो. अं. दादासो नाळे, निलेश परदेशी, शाहीद शेख, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.




















