लोक वार्ता – राज राठोड
पुणे: शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे पोलीस दलाने कंबर कसली असून, खंडणीविरोधी पथकाने एका धडाकेबाज कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ६४ हजार ३०० रुपये किमतीची ४ गावठी बनावटीची पिस्तूलं आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग आणि फरारी आरोपींचा शोध घेत असताना, खंडणी विरोधी पथक-२ मधील पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे आणि प्रशांत शिंदे यांना खात्रीशीर बातमी मिळाली. पोलीस रेकॉर्डवरील आरोपी रोहित दुर्गेश धर्माधिकारी हा शिवाजीनगर येथील ज्ञानेश्वर पादुका चौकात येणार असून, त्याच्याकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

थरारक पाठलाग करून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
मिळालेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात सापळा रचला. संशयास्पदरित्या वावरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २४ वर्षे, रा. जुनी सांगवी, पुणे)
२. अभिषेक राजू टेंकल (वय २३ वर्षे, रा. जुने शिवाजीनगर बस स्टँड मागे, पुणे)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता, त्यांच्याकडे खालील साहित्य मिळून आले:
४ गावठी बनावटीची पिस्तूलं: लोखंडी धातूची, सिल्व्हर रंगाची आणि मॅग्झीनसह (किंमत १लाख ६०हजार रुपये).
५ जिवंत काडतुसे: एकूण मुद्देमाल: १लाख ६४हजार ३०० रुपये.
आरोपींकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे कोठून आली आणि त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता, याचा अधिक तपास आता खंडणीविरोधी पथक करत आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, मा. यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, रविंद्र रोकडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, साहिल शेख, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, गणेश खरात, शेखर खराडे, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी केली.




















