लोक वार्ता –राज राठोड
पुणे | गणपती उत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल ७ गुन्ह्यांचा छडा लावत ७ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते ११.३० दरम्यान बेलबाग चौक ते लक्ष्मीरोडच्या डाव्या बाजूच्या फुटपाथवर गणपती दर्शनासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीत एका अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील २ तोळ्यांची सोन्याची रुद्राक्ष साखळी चोरली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध:
तपासादरम्यान पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयिताची ओळख पटवण्यात आली. तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल भोसले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी परशा उर्फ प्रशांत शिवराम शिंदे (वय २२, रा. खुळेवाडी, पुणे) याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
ताब्यात घेतल्यावर कबुली आणि आणखी ७ गुन्ह्यांचा पर्दाफाश:
सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तपास पुढे जाताच विश्रामबाग पोलीस स्टेशनमधील आणखी ७ चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
साथीदाराकडून मुद्देमाल हस्तगत:
आरोपीने चोरीचा मुद्देमाल आपल्या घराजवळील साथीदाराकडे ठेवला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून ७०.३७ ग्रॅम वजनाचे, एकूण ७ लाख, ११हजार रुपयांचे सोन्याचे विविध दागिने जप्त केले आहे.
नागरिकांना आवाहन:
गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१, पुणे शहर, श्री. कृषीकेश रावळे, मा. सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप कसबे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. अरुण घोडके यांच्या सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, अमोल भोसले, आशिष खरात, सागर मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख, अर्जुन थोरात, नितिन बाबर, राहुल माळी, महिला पोलीस अंमलदार पठारे यांनी केली.




















