लोक वार्ता – राज राठोड
पुणे : काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पथकाने दादा गुजर शाळेजवळ संशयित हालचाली करणाऱ्या इसमाला पाठलाग करून अटक केली. इरफान रईसउद्दीन मलीक (वय ३२, रा. काळेपडळ) याच्याकडून १ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर माहितीसाठी :
काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीत, तडीपार आरोपी तसेच अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तपास पथक पेट्रोलिंग करत असताना एक मोठी कारवाई उघडकीस आली आहे.
पोलीस अंमलदार अतुल पंधरकर व शाहीद शेख यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इरफान मलीक हा इसम दादा गुजर शाळेजवळ, साठेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संशयास्पद हालचाली करत उभा आहे आणि त्याच्याकडे अग्निशस्त्र असण्याची शक्यता आहे. ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांना कळविण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संबंधित इसम पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून १ गावठी बनावटीची पिस्टल व २ जिवंत काडतुसे, असा सुमारे ५१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीचे नाव इरफान रईसउद्दीन मलीक (वय ३२, रा. संकेतविहार, काळेपडळ, पुणे) असे असून त्याच्यावर बीएनएस कलम ३(२५), ३(५) तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग (अति. कार्य) श्रीमती अनुराधा उदमले, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन श्री. मानसिंग पाटील, यांचे सुचनेप्रमाणे सहा.पो.निरी. अमित शेटे, पोलीस उप-निरीक्षक विनायक गुरव, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, प्रदिप बेडीस्कर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली.




















