धनकवडीमध्ये वाहनांची तोडफोड करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद
लोक वार्ता – राज राठोड
पुणे: धनकवडी परिसरात वाहनांची तोडफोड करत स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत प्रमुख आरोपीसह दोन तरुण आणि तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश असून, घटनास्थळी वापरण्यात आलेली एक दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
चौकशी व अटक कारवाई:
दि. २४ जुलै रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकारनगर पोलीस ठाण्याचे सपोनि सागर पाटील आणि पोलीस अमलदार अमोल पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई पार पडली. आरोपी रोहित कैलास आढाव (वय २१) हा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे नोंदीवर असलेला सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तो नवले ब्रिज परिसरात आपल्या साथीदारासोबत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला व त्याच्या साथीदार सुधीर बाप्पू सावंत (वय १९) याला अटक केली.
त्यानंतर त्यांच्या माहितीवरून उर्वरित तीन अल्पवयीन आरोपींनाही त्यांच्या राहत्या घरी ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली अंदाजे ३० हजार रुपये किंमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नागरिकांतून समाधान: धनकवडी परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या जलद कारवाईमुळे समाधानाचे वातावरण आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सदरची कामगीरी, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, मिलींद मोहीते, सहा पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, प्रदिप रेणुसे, अमित पदमाळे, महेश भगत, आकाश किर्तीकर, मारोती नलवाड, बजरंग पवार, सागर सुतकर, योगेश ढोले, खंडु शिंदे, यांनी केली आहे.




















