लोक वार्ता – राज राठोड
पुणे : लष्कर आणि कोंढवा परिसरात बँक व कार्यालयांमध्ये घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई लष्कर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि १०० ते १३५ सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे केली. या टोळीतील दोघे आरोपी हे आधीपासूनच चोरी व घरफोडीप्रकरणी पोलीस अभिलेखात नोंदवलेले गुन्हेगार आहेत.
दि. १५ जुलै २०२५ रोजी कॅम्प परिसरातील अदिती बिझनेस सेंटरमधील यूनियन बँक ऑफ इंडिया आणि त्याच्या शेजारील कार्यालयात एका अनोळखी इसमाने खिडकीतून प्रवेश करून घरफोडीचा प्रयत्न केला. आरोपीने टेबल ड्रॉवर, कपाट अस्ताव्यस्त केले, तिजोरी हलवून पाहिली, आणि काही दस्तऐवजांची नासधूस केली. या प्रकरणी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कॅम्प ते फुरसुंगी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून गुन्ह्यात वापरलेले वाहन ओळखण्यात आले. पोलीस अंमलदार लोकेश कदम आणि सागर हराळ यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने वाहन आणि आरोपींचा माग काढण्यात आला.
रामटेकडी परिसरात आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.
1. आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी (२१) – रा. फुरसुंगी
2. विशाल मारुती आचार्य (२५) – रा. रामटेकडी
3. ओमकार सुरेश गोसावी (२२) – रा. फुरसुंगी
यातील आर्यन माने आणि ओमकार गोसावी हे पूर्वीपासून चोरी आणि घरफोडीचे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर हडपसर, वानवडी, लोणीकंद पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आरोपींकडून चोरीचा काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्याकडून इतर गुन्ह्यांचीही चौकशी सुरु आहे.
सदर ची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर, मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा अति. कार्यभार लष्कर विभाग, पुणे, अतुलकुमार नवधीरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गिरीषकुमार दिघावकर, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे व पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, प्रविण गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण, लोकेश कदम, सागर हराळ व अमोल कोडीलकर यांनी केली आहे.




















