लोक वार्ता न्यूज – राज राठोड
पुणे – काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडून दुचाकी टायर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल, ३लाख ५३हजार १७५ किंमतीचे नवीन दुचाकी टायर व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि कटावणी जप्त करण्यात आली आहे.
ही चोरी टायर दुरुस्ती व विक्री करणाऱ्या दुकानातून करण्यात आली होती. या गुन्ह्याची नोंद काळेपडळ पोलीस ठाण्यात झाली होती. प्रकरणाचा तपास करताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे व लक्ष्मण काळे यांनी ४५ ते ५० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यातून आरोपीने वापरलेल्या रिक्षाचा क्रमांक व त्याची प्रतिमा स्पष्टपणे दिसून आली.
त्यानुसार आरोपीला जैन टाऊनशीप, हडपसर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव परवेझ लियाकत काझी (रा. सय्यदनगर, हडपसर) असे असून तो व्यवसायाने रिक्षाचालक आहे.
तपासादरम्यान परवेझ याने कबुली दिली की, तो उंड्री, महंमदवाडी, हांडेवाडी, लष्कर, गोकुळनगर परिसरांमधून पहाटेच्या सुमारास कटावणीच्या साहाय्याने दुकानांचे लॉक तोडून नवीन दुचाकी टायरची चोरी करत असे.त्याच्याकडून खालील पोलीस ठाण्यांमधील ५ गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे:
काळेपडळ पोलीस स्टेशन – ३ गुन्हे
लष्कर पोलीस स्टेशन – १ गुन्हा
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन – १ गुन्हा
या कारवाईदरम्यान एकूण ३लाख ५३ हजार रुपयांचे टायर, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, तसेच कटावणी जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो.अं. श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.




















