लोक वार्ता – राज राठोड
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आज, रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे महाआरती करून या मंगलमयी दिवसाची सुरुवात करण्यात आली.

महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांच्या हस्ते सकाळी श्री कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी मंदिरात शास्त्रोक्त पद्धतीने आरती करण्यात आली. पुणे शहराच्या सुख-समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.

पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम: येथील पंडित नेहरूंच्या पुतळ्यास महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते आणि

उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

संत सेवालाल महाराज जयंती: आज थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराज यांची जयंती असल्याने, महापालिका भवनातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाजवळील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या सर्व कार्यक्रमांना महानगरपालिकेचे विविध विभागांचे पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पुणे शहराच्या विकासाचा वारसा असाच पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.




















