लोक वार्ता – राज राठोड
पुणे | वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केवळ २४ तासांच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल ₹५,८७,०५०/- किंमतीचे हि-याचे व सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे ही चोरी घरकाम करणाऱ्या मोलकरणीनेच केल्याचे तपासात उघड झाले आहे.
घटना अशी की, दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता सोपानबाग येथे राहणारे रिटायर्ड विंग कमांडर आणि त्यांची पत्नी घाबरलेल्या अवस्थेत वानवडी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आपल्या घरातून तब्बल ५.८७ लाख किंमतीचे सोने व हि-याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांच्याकडे नोंदवली.
यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदमाने यांनी तात्काळ तपासपथकाला आदेश देत गुन्हा दाखल केला (गु.र.नं. ३४३/२०२५ भा.दं.सं. ३०५). तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपविण्यात आली.
तपासादरम्यान घरकाम करणाऱ्या दोन महिलांची पडताळणी करण्यात आली असता, त्यापैकी सुधा राजेश चौगुले (वय ३५, रा. बी.टी. कवडे रोड, घोरपडीगाव, पुणे) हिच्यावर संशय निर्माण झाला. त्याचवेळी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, ही महिला अचानकपणे सोनाराकडे दागिने गहाण ठेवण्याकरिता आली आहे.
यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली व लपवून ठेवलेले सर्व दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. एकूण ₹५,८७,०५०/- किमतीचे हि-याचे व सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
सदर आरोपी सुधा चौगुले हिला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास वानवडी पोलिसांकडून सुरू आहे.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलिस उप आयुक्त, परि-५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलिस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरीष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री राजकुमार डोके यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, शैला ठेंगल आणि पुष्पा बोरकर यांनी केली आहे.




















