लोक वार्ता –राज राठोड
पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शहरात पिस्तूल दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला अटक केली आहे. पोलिसांनी कसबा पेठ येथील त्याच्या घरातून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
ईश्वर प्रशांत टुपसुंदर वय (२२) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीविरोधी पथकातील अंमलदार अमोल आव्हाड आणि मयूर भोकरे गस्त घालत असताना त्यांना तुपसुंदर नावाच्या आरोपीकडे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने कसबा पेठ येथील त्याच्या घरी छापा टाकला.
पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपीने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर त्याने एका पिशवीत पिस्तूल लपवल्याचे कबूल केले.
त्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांच्या तपासणीत, तुपसुंदरवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. तो कोणत्याही टोळीशी संबंधित आहे का, याचीही पडताळणी पोलिस करत आहेत.
या संदर्भात, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी सांगितले की, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो जामिनावर बाहेर होता. आरोपीकडून पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे, पुढील कारवाईसाठी त्याला फरासखाना पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, शाखा श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा १, पुणे शहर श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उप-निरीक्षक रामेश्वर पारवे, पोलीस अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, रहिम शेख, मयुर भोकरे, विजय कांबळे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, बाला रफिक शेख, अमर पवार, गीतांजली जांभुळकर यांनी केली आहे.




















