लोक वार्ता न्यूज – राज राठोड
पुणे – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात दिनांक १ ऑगस्ट रोजी भव्य संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, भारताला हिंदुराष्ट्र घोषित करावे आणि गोमातेला राष्ट्रमाता म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या संत संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक मंच आणि नरेंद्र मोदी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी स्वदेशानंद ब्रह्मगिरी महाराज होते, तर नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी चाणक्य यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यमराज खरात यांना आयोजनाबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमात देशभरातून आलेल्या संत, विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेचे समर्थन केले. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याचीही जोरदार मागणी उपस्थितांनी लावून धरली.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आणि कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपक्रम राबविण्याचा संकल्पही या संमेलनात करण्यात आला.
कार्यक्रमात भारतीय तत्त्वज्ञानाचे जागतिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “भारतीय तत्त्वज्ञान हे संपूर्ण जगासाठी दिशा देणारे असून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे, असा विश्वास या दोन्ही संस्थांनी व्यक्त केला.





















