लोक वार्ता –राज राठोड
हडपसर पोलिसांकडून दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या सुचनांनुसार १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पोलिसांनी जनजागृती मोहीम राबवली.
या उपक्रमांतर्गत गाडीतळ हडपसर, अण्णासाहेब मगर कॉलेज, अॅमनोरा स्कूल, तसेच मनपा शाळा क्रमांक ३२ येथे पथनाट्य, फ्लेक्स, कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनाचे घातक परिणाम, त्यापासून होणारे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम, तसेच त्यांच्याकडे बाळगल्यास कायदेशीर कारवाई कशी होऊ शकते याची सविस्तर माहिती देण्यात आली.
दहीहंडी उत्सव (१६ व १७ ऑगस्ट) दरम्यान मांजरी व हडपसर भागात हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांपर्यंत अंमली पदार्थ विरोधी संदेश पोहोचविण्यात आला. फ्लेक्स, होर्डिंग्ज आणि जनजागृतीपर मार्गदर्शनाद्वारे नागरिकांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
ही मोहीम मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परि-५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांच्या देखरेखीखाली पार पडली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन श्री. संजय मोगले, पोनि. (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे) श्रीमती अश्विनी जगताप, तसेच पोलीस अंमलदार समीर पांडुळे व सचिन शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या अनोख्या उपक्रमामुळे हडपसर परिसरात उत्सवसोबतच समाजहिताचा संदेशही पोहोचविण्यात यश आले. नागरिकांनी या मोहिमेचे मनापासून स्वागत केले.




















